धक्कादायक ! साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच बलात्कार

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यातील जावळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हि घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मेढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणातील 14 वर्षीय पीडित मुलगी जावळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत शेतातच वास्तव्याला आहे. एके दिवशी तिच्याच वर्गात शिकणारी दोन अल्पवयीन मुले या पीडित मुलीच्या घरी आले. यानंतर त्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून चाकूचा धाक दाखवत या पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांनी याचे व्हिडिओ शूटिंगदेखील केले. यानंतर आरोपींनी मोबाईलवर केलेल्‍या चित्रीकरणाच्या आधारे पीडितेवर अनेकवेळा बलात्कार केला. यामधून हि पीडित मुलगी गर्भवती राहिली.

या दरम्यान पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी या पीडितेला तपासले असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडितेने बदनामी होईल म्हणून या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली नव्हती. मेढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like