हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच वातावरण असलं तरी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके आणि भाजप नेते समाधान अवताडे यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी भाजप धक्का देणार का यांकडे सर्वांचे लक्ष आहे.
निवडणूक का लागली –
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणुक जाहीर झाली.दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
भगीरथ भालके यांना सहानुभूती मिळणार?? –
राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा गतवर्षी झालेल्या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता. त्यावेळचे भाजप उमेदवार सुधाकर परिचारक आणि अपक्ष समाधान अवताडे यांच्या मतांची बेरीज केली असता अवताडे यांच्याकडे भगीरथ भालके यांच्यापेक्षा 40 हजार मध्ये जास्त आहेत. पण भारत भालके यांचं निधन झाल्याने त्यांचे सुपुत्र भगीरथ यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आत्ता राष्ट्रवादी एकटी नसून त्यांच्याकडे महाविकास आघाडीचे पाठबळ आहे.
भाजपने का लावलाय जोर –
राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. राज्यात सर्वाधिक आमदार असून देखील भाजप सत्तेबाहेर आहे. त्यामुळे भाजपला मोठी सल बोचत आहे. त्यामुळे या निडवणुकीत विजयी होऊन जनमत भाजपच्याच बाजूने असून भाजपचीच राज्यात लाट असल्याचं भाजपला दाखवून द्यायचं आहे. शिवाय कोरोनापासून ते आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा संदेशही भाजपला द्यायचा आहे.
राष्ट्रवादी बाजी मारणार? –
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच ही पोटनिवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जोर लावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 4 दिवसापासून तिथे तळ ठोकून आहेत. तसेच भाजप मधून परत राष्ट्रवादी मध्ये आलेले कल्याणराव काळे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page