हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना अध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “शरद पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा कधीच द्यायचा नव्हता. पण पक्षातील काही नेत्यांनी हट्ट केल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तसेच , त्यावेळी पक्षातील नेत्यांनी भाजपासोबत जाण्याचा हट्ट धरला होता, म्हणून पवारांनी राजीनामा दिला. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
..म्हणून पवारांनी राजीनामा दिला
यापूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उकरून काढला होता. त्यावर आज भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याचे खरे कारण माध्यमांना सांगितले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “शरद पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता. परंतु त्यावेळी पक्षातील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा हट्ट धरल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला होता. भाजपसोबत येण्यास शरद पवारांनी नकार दिला होता. छगन भुजबळांच्या विचारधारेत मोठा विरोधाभास आहे”
छगन भुजबळांच वक्तव्यं
दरम्यान, “शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचं, यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं असं ठरलं असल्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. “15 दिवस पवारांच्या घरात चर्चा झाली असावी, सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील मग राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल हे ठरलं होत” असे देखील छगन भुजबळ यांनी म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याचे कारण माध्यमांसमोर मांडले आहे.