जेजुरी हुल्लडबाजीप्रकरणी पडळकरांवर कारवाई का नाही केली? विक्रम ढोणे यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणेः जेजुरी गडावर वर्षभरापुर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुडगूस प्रकरणात वर्षभरात पोलिस कारवाई झालेली नाही. त्यामुळे दंगेखोर प्रवृत्तींना बळ मिळत असल्याची भुमिका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे.

संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अहिल्यादेवींचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०२१ रोजी जेजुरी देवस्थान ट्रस्टतर्फे नियोजित होता. सायंकाळच्या सत्रात हा कार्यक्रम होण्यापुर्वीच पहाटेच्या वेळेला जेजुरीत येऊन आमदार पडळकरांनी काही भाजप कार्यकर्त्यांसह पुतळ्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी केली. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते इतके उन्मत्त झाले होते की पुतळ्याभोवतीचा लोखंडी चबुतरा हलत होता. त्यांनी तिथे मारामारी करून कार्यक्रमाला गालबोट लावले.

भाजपच्या नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकर यांनी खालची पातळी गाठली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्याप्रमाणे पुढे चौकशी करून कारवाई होणे गरजेचे होते. या प्रकरणाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिथावणी आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे होते, मात्र तशी चौकशी झाली नाही. केलेल्या गुन्ह्याचे सर्व पुरावे उपलब्ध असताना गुन्ह्याचा तपासही झालेला नाही.

पुणे पोलिसांच्या उदासीन भुमिकेमुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश गेला आहे. पडळकर यांचे काही सहकारी अनेक ठिकाणी दहशत पसरवत आहेत. त्यांना कायद्याचा धाक बसणे आवश्यक आहे. महत्वाची बाब म्हणजे अहिल्यादेवी यांच्या व्यतीरीक्त अन्य महापुरूषाच्या पुतळ्याच्या ठिकाणी हा प्रकार झाला असता तर पोलिस असेच गप्प बसले असते कां, असा सवाल करत याप्रश्नी आंदोलनाची भुमिका घेणार असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

गतवर्षीच्या हुल्लडबाजीचे भाजप नेते भुषणसिंह होळकर यांनीही समर्थन केले होते. त्यावेळी त्यांनी पवार घराण्याचा होळकरांच्या संपत्तीवर डोळा आहे, असा आरोप केला होता. त्यासंबंधीची अधिक माहितीही ते जाहीर करणार होते. मात्र वर्षभर झालेतरी त्यांनी अशी माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी अजूनही त्यासंबंधीची माहिती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment