टीम हॅलो महाराष्ट्र । CAA आणि NRC विरोधात सध्या देशभर आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आघाडीवर आहेत. मात्र, जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील झालेल्या हल्ल्यानंतर चित्रपटसुष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. या हल्ल्यानंतर बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार आपली भूमिका परखडपणे मांडत आहेत. कधी सोशल मीडिया तर जाहीरपणे आंदोलनात सहभागी होऊन ते आपलं मत मांडत आहेत.
यात आता एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करणारी अभिनेत्री रसिका आगाशेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अखिल भारतीय विद्यार्थी परीषद का सोडलं त्याचं कारण सांगितलं. एवढंच नाही तर आपल्या पोस्टमध्ये तिने जनतेला त्यांना नक्की काय हवंय असा प्रश्नही विचारला.
रसिकाने फेसबुकवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा आहे.’
‘इथे लहानपणापासूनच मुघलांच्या काळापासून मुस्लिमांनी आपल्यावर नेहमीच कसं आक्रमण केलं, मंदिरं पाडली, डाव्या विचारसरणीचे लोक कसे चांगले नाहीत, गांधीजींनी फक्त चुका कशा केल्या.. हिंदू असणं ही अभिमानाची गोष्ट आहे, अशा गोष्टी शिकवल्या जातात. या सगळ्यात कधी हा प्रश्न पडला नाही की, समोर कबाब विकणारा मुघल तर दिसत नाही.. कॉलेजमध्ये असताना कधी हे ही कळलं नाही की राज्य करणारे चांगले वाईट होते.’
‘सगळ्याच धर्मात राज्य करणारे चांगले किंवा वाईट असतात. डाव्या विचारांचे लोक किंवा समाजवादी लोक समानतेबद्दलच बोलताना दिसतात. गांधी तर सत्य आणि अहिंसेबद्दल बोलायचे. मी हिंदू घरात जन्मले हा एक निव्वळ योग आहे. मी कोणत्याही घरात जन्माला आले असते. मग यात अभिमान वाटण्यासारखं काय आहे. असेच काही प्रश्न होते, ज्यांची उत्तरं मला मिळाली नाहीत म्हणून मी अभाविप सोडली. तेव्हा मी १२ वीची परीक्षा दिली होती.’
‘असो.. ही पोस्ट माझ्याबद्दल नसून तुमच्याबद्दल आहे. पण मी हे सांगू इच्छिते की, मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत नाही. तसेच कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडली गेली नाही. राजकारणी कोणत्याही विचारधारेशी जोडलेल्या पक्षामध्ये असोत, ते त्यांच्या कामामुळे चांगले किंवा वाईट असतात यावर माझा विश्वास आहे. मी मुस्लिमांच्या पक्षात नाही आणि मी हिंदूंच्या पक्षातही नाही. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या बाजूने आहे.’
‘आता तुम्हीही जरा विचार करा. माझा विश्वास आहे की तुम्हीही वाईट नसाल. तुम्ही हिंसेच्या बाजूने नसाल. पण सकाळ- संध्याकाळ फोनवर जे मेसेज येतात ते कितपत खरे किंवा खोटे आहेत यातला फरकही तुम्हाला करता येत नसेल. कारण लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या मनावर कटू आठवणी साठवल्या जातात. यामुळे अनेकदा आपण हेही विसरून जातो की ज्या आठवणी आपण साठवून ठेवल्या आहेत ते आपल्या स्वतःच्या नाहीत.’
‘हे सगळं राहू द्या. पण खरं सांगा.. तुम्हाला हिंदू राष्ट्र हवं आहे का? इतर धर्माचे लोक देशातून जावेत असं तुम्हाला वाटतं का? मुस्लिमांनी दुय्यम दर्जाच्या वागणूकीने देशात जगावं असं खरंच तुम्हाला हवंय का? दलित, भटक्या आणि रस्त्यावर जगणाऱ्या लोकांना या देशात जगण्याचा अधिकार नाही?’
‘खरं म्हणजे चूक तुमची नाही. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकवलं जातं की, आपली जात, आपला धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. जर एखादी व्यक्ती इतरांपेक्षा मोठ्या जातीत किंवा धर्मात जन्माला आल्यामुळे असं मानत असेल तर त्याची मूळ विचारसरणीच असंवैधानिक नाही का…’
‘जे लहानपणापासून शिकवलं गेलं ते आता विसरून आजूबाजूच्या परिस्थितीकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. जो द्वेष सतत पसरवला जात आहे, त्याच्या पलिकडे जाण्याची गरज आहे. इतिहासात जे हल्ले झाले त्यात फक्त लोक मेले. धर्म मेला नाही हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता एकत्र राहण्याची गरज आहे… सर्वांना!’
सध्या सोशल मीडियावर रसिकाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. रसिकाच्या ह्या पोस्टला अनेकांनी सहमती दर्शवली तर काहींनी कमेन्टमध्ये याचा पूर्ण विरोध केला आहे. यासर्वात सोशल मीडियावर ट्रोल होण्याची भीती असताना चित्रपट क्षेत्रातील मंडळी आता निर्भीडपणे आपली मत मांडताना दिसत आहेत.