बिकानेर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने आपल्या पतीला शॉक देऊन त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दरम्यान पतीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यात यश आले नाही.
मृत व्यक्तीचे नाव महेंद्र दान असे असून त्याच्याच पत्नीने शॉक देऊन त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती रात्री कामावरुन घरी आल्यानंतर तिने त्याला जेवणातून गुंगीचं औषध दिलं. यानंतर पती बेशुद्ध झाल्यानंतर पत्नीने त्याला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले आणि त्याच्या पायाला शॉक दिला.
यानंतर आरोपी पत्नीने पतीच्या भावाला आणि वडिलांना कॉल केला आणि पतीला शॉक लागल्याची माहिती दिली. त्यानंतर महेंद्रला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला. आरोपी महिलेने तिचा पती दारुडा असल्याचं सांगितलं. तो रोज मारहाण, शिवीगाळ करत असल्याने ती त्रासात होती. तसंच काही दिवसांपूर्वी पतीने दारुच्या नशेत आपल्या भावाशी भांडण केल्यानेही ती नाराज होती. त्याचाच बदला घेण्यासाठी तिने हे पाउल उचलल्याचे सांगितले आहे.