पुणे । ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची अनोखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच आपल्या विजयी उमेदवार पतीला चक्क खांद्यावर उचलून घेतले होते.
गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायाचा हटके जल्लोष केला.
पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवाराला पराभूत केले. या उत्साही पती-पत्नीचे फोटो गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या पती-पत्नीच्या राजकारणातील उत्साहाचं कौतुक केलंय.
निवडणुकीत उमेदवार जिंकला की जवळचे दोस्त, कार्यकर्ते किंवा उमेदवाराच्या वजनाला पेलू शकेल, अशी व्यक्ती विजयी उमेदवारा खांद्यावर उचलतात. कपाळी गुलाल, गळ्यात हार आणि हलगीनं वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. पण, खुद्द पत्नीनं आपल्या पतीला खांद्यावर उचलत असा विजयोत्सव साजरा केल्याचं हे दृश्य अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून गेलं.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’