पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील हडपसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने चाकूने सपासप वार करत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. आरोपीने अनैतिक संबंधाच्या रागातून हि हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव अंजली नितीन निकम असे आहे. ती २२ वर्षांची होती. तर नितीन बापू निकम असे आरोपी पतीचे नाव आहे. हे दोघे पती पत्नी भोसरीतील चक्रहास वसाहतीत राहत होते. आरोपी पती नितीन हा मागच्या काही दिवसांपासून पत्नी अंजलीवर चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात अनेकदा वादसुद्धा झाले होते. या भांडणाला कंटाळून मृत अंजली हडपसर गाडीतळ येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आली होती. पत्नी बहिणीकडे गेल्याचा राग मनात धरून आरोपी पती नितीनने पत्नी अंजलीच्या हत्येचा कट रचला.
शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी नितीन आपल्या पत्नीला घेण्यासाठी मेव्हुणीच्या घरी गेला. तिकडून पत्नीला घेऊन तो, आपल्या मुलाला घेण्यासाठी सासूच्या घराकडे निघाला.यानंतर आरोपीने गाडीतळ बंटर शाळेच्या आवारात निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. या हल्ल्यात पत्नी अंजली जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर गाडीतळ याठिकाणी राहणारी मृत अंजलीची बहीण वैशाली अर्जुन गायकवाड यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.