नवी दिल्ली । भारतीय संघाने 8व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ 5व्यांदा अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
अंडर-19 वर्ल्ड कप-2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. एका क्षणी दोन विकेट लवकर पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला कर्णधार यश धुळ आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी द्विशतकी भागीदारी करत सांभाळले. यशने 110 धावा केल्या तर शेख रशीदचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले. भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 290 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 41.5 षटकांत 194 धावांवर गारद झाला. भारताने या आयसीसी स्पर्धेच्या 8व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपच्या चालू हंगामात भारताने पहिला गट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यात भारतीय संघ 232 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 45.4 षटकांत 187 धावांत गुंडाळले. भारताने टूर्नामेंटमध्ये 45 धावांनी विजय नोंदवत विजयी सुरुवात केली.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना आयर्लंडविरुद्ध होता. त्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत 50 षटकात 5 गडी गमावून 307 धावा केल्या. हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली. या सामन्यात आयर्लंडचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि त्यांचा संघ 133 धावांत ऑलआऊट झाला. भारताने 174 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भारताने अंडर-19 वर्ल्ड कपमधील तिसरा गट सामना युगांडा विरुद्ध खेळला. या सामन्यात भारताच्या फलंदाजा आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. या सामन्यात भारताने 5 विकेट गमावून 405 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर युगांडाच्या संघाला अवघ्या 19.4 षटकांत 79 धावांवर बाद करत 326 धावांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला.
अंडर-19 वर्ल्ड कपमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 विकेट्स राखून पराभव केला. डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी कुमारने अवघ्या 14 धावांत 3 बळी घेतल्याने बांगलादेशी संघ 111 धावांत बाद झाला. यानंतर भारताने हे लक्ष्य 30.5 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.