हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेमध्ये बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळेच राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापित झाले आहे. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असताना एक वेगळीच चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. या चर्चांनी राजकिय वर्तुळात जोर धरला असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे.
संदीप देशपांडे यांनी शिंदे गट आणि मनसेच्या युतीसंदर्भात बोलताना म्हटले की, राज ठाकरे युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेतील. ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील. तसेच, “अशातच आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते” असा टोला देखील संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
त्याचबरोबर, “राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. 2024 च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल.” असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, “आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते घेऊन राज ठाकरे जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल तर त्यात वावगं नाही.” असे वक्तव्य संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात केले आहे.