नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटानं केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मजूर-कामगार वर्गाला बसला आहे. उद्योगधंदे बंद असल्यानं उदरनिर्वाहाचं मोठं संकट त्यांच्या पुढं उभं आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले अनेक कामगार शहरांमध्ये अडकून पडले आहेत. तर सरकारी यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. असं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. उलट त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. म्हणूनच सरकारच्या या कारभाराविरोधात उद्या, २१ एप्रिल रोजी देशव्यापी निषेध दिवस पाळण्यात येणार आहे.
त्यानुसार सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या बाल्कनीत, दरवाज्यासमोर वा अंगणात उभे राहणाऱ्यांनी या मागण्यांचे फलक हातात घ्यावेत. सोशल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून हे निषेध प्रदर्शन करावं, असं असं आवाहन कामगार संघटनांकडून करण्यात आलं आहे. तसेच आंदोलकांनी घोषणा देऊन त्याचे व्हिडिओ किंवा फोटो काढून व्हाॅट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अपलोड करावेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे. सेंटर ऑफ ट्रेड इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) संघटनेनं या निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेनंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. ‘पंतप्रधान केवळ टीव्हीवर येऊन पोकळ भाषणे देत आहेत. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे याची माहिती देण्याऐवजी लोकांनाच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देत आहेत आणि त्यांच्यावरच विविध जबाबदार्या टाकत आहेत. याचा निषेध या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
सीटू’नं आंदोलकांच्या मागण्यांची यादीच जाहीर केली आहे. मजुरांना रेशन, प्रत्येक बिगर आयकरदाता कुटुंबाला ३ महिने मासिक ७५०० रुपये आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, करोना तपासणी व उपचाराची गती वाढवा व उपचारांची मोफत व्यवस्था करा, लॉकडाऊनच्या काळात कामगार किंवा वेतन कपात चालणार नाही, सर्व आरोग्य व पोषण आदी प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधने, विशेष प्रोत्साहन भत्ता द्या, संकटकाळात सार्वजनिक सेवा देणाऱ्या अंगणवाडी, आशा, गट प्रवर्तकांना कायम शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था करा अशा विविध मागण्या सीटू’नं केंद्र सरकारला केल्या आहेत.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”