सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावे त्यांच्या गावा | मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत. [लेखामध्ये त्यांनी उल्लेख केलेला मदिरा हा शब्द दारु (मद्य) अशा अर्थाने आहे.]

दारुविक्रीचा सावळा गोंधळ का? – मदिरेबाबत सर्वोत्तम साहित्यिक स्तरावर भाष्य गालिबच्या मांडणीत दिसते. हरीवंशराय बच्चन यांच्या अजरामर ‘मधुशाला’ने मदिरा आणि मदिरालयाची प्रतिकं वापरून एक वेगळेच विश्व आपल्यासमोर उभे केले आहे. पण यापलीकडेही मदिरेचे वेगळे वास्तव आहेच. सोमरस, व्होडका, रम, बियर, व्हिस्की, वाईन, दारू अशा भिन्न नावाने प्रसिद्ध असलेली मदिरा कायमच बदनाम राहिली आहे. आताही मदिरा विक्रीचे व्यवस्थापन ढासळल्याने गोंधळ उडून कोरोना संकट वाढेल अशी शंका उपस्थित होत आहे. अगदी असाच गोंधळ किराणा आणि भाजीपाला बाजारात देखील दिसतोय. त्यामुळे मदिरा किंवा अन्य वस्तू विक्री वितरणात व्यवस्थात्मक सभ्यता लोक पाळणार की नाही हा प्रश्न आहे. आतापर्यंतचा गोंधळ पाहता समाज आणि शासनाला व्यवस्थापनाचे आणखी कठोर आणि अचूक निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा खूप मोठा काळ लॉकडाऊन वाढून आर्थिक आणि अन्य व्यवस्था कमकुवत होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. हा गोंधळ टाळला पाहिजे.

आता कोरोना संकटकाळात मदिरेची विक्री सुरू केल्याने गोंधळ आणि चर्चा होणे स्वाभाविक होते. दारुप्रेमी विरुद्ध दारुविरोधी असा एकूण लढा आता सुरु झाला आहे. सहजपणे या मदिरेचा आर्थिक लेखाजोखा गुगलवर तपासला असता असे लक्षात आले की, २०१४ ते २०१९ या आर्थिक काळात तब्बल ३० हजार ३३१ कोटी रूपये कररुपाने भारतातील शासकीय खजिन्यात जमा झाले आहेत. या संपूर्ण रकमेतील ४५१८ कोटी रुपये (वार्षिक – ९०० कोटी रुपये) एवढा वाटा महाराष्ट्राचा आहे. दारुविक्रीचा कर जमा करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हे आर्थिक वास्तव कानडोळा करण्याइतपत नक्कीच नाही. या महसूलावर पाणी सोडून जगण्याची समाजाची आणि शासनाची प्रामाणिक इच्छा आहे का? या महसूलावर पाणी सोडत, मदिरा निर्मिती आणि मदिरेचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे का? याचाही प्रमाणिकपणे विचार करायला पाहिजे. आपण महाराष्ट्रापुरता विचार केल्यास वार्षिक 900 कोटी रुपयांचा महसूल तुटवडा आपण कसा भरुन काढणार आहोत ? आपल्याजवळ इतर पर्यायी आर्थिक नियोजन आहे का? राज्यातील असे कुठले खर्च आहेत की जे कमी केले म्हणजे हा महसूल तुटवडा राज्य सहन करू शकेल? आणि सध्याच्या कोरोना संकटात ते शक्य आहे का? याचा वास्तविक विचार केला पाहिजे.

महसूल प्रश्नाने दारुला तारले? – मदिरेबाबतची चर्चा अतिशय दांभिकतेतून सुरू असल्याचे दिसते. रोखठोक भूमिका घेण्याची सरकारमधील किंवा सरकारबाहेरील कुणाचीही तयारी नाही. समर्थन करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा प्रामुख्याने महसूल हाच आहे. जो वर उल्लेख केलेल्या आकडेवारीत अगदी स्पष्ट दिसतो. याउलट विरोध करणाऱ्यांचा मुद्दा अनिती, हिंसाचार, गरीब कुटुंबातील आर्थिक आणि इतर नुकसान हा आहे. अर्थात देशाला महसूल मिळावा एवढ्या उदात्त भावनेने कुणीही मदिरेचीचव घेत नाही हेही स्पष्ट आहे. ज्यांना मदिरा प्राशन आवडते,आनंद मिळतो, काही फायदा वाटतो किंवा सांस्कृतिक जीवनातील भाग आहे म्हणून गेली हजारो वर्षे स्री-पुरुष मदिरा घेताना दिसतात. मोहाची दारु कीती आरोग्यदायी अशाही चर्चा अनेक लोकांकडून होत असतात. तांदळाची बियर ही नॉर्थ इस्टमध्ये नाष्ट्यातील प्रमुख घटक आहे. तिकडे स्थानिक परंपरागत पद्धतीने ती बनवून स्त्री आणि पुरुष, दोघेही पितात. मदिरा पिण्यासाठी तुम्ही पुरुषच असायला हवं असं बिल्कुल नाही. मदिरा पिण्याची पद्धत, कारणे, किती आणि कशी प्यायची याची मोजमाप सर्वत्र वेगवेगळी दिसतात. अनेक ठिकाणी धार्मिक समारंभाचा प्रतिष्ठित भाग मदिरा आहे. कुणाला लिमिटेड मदिरा आरोग्यासाठी चांगली वाटते म्हणून पितात. मदिरा कुठलाही सामाजिक, धार्मिक, आर्थिक, जातीय असा भेदभाव करीत नाही. तरीही झोपडपट्टीतील मजूर हा बेवडा ठरतो तर उच्चस्तरीय ड्रिंक्स घेणारा कूल ठरतो.

नैतिक – अनैतिकतेच्या चौकटी – मदिरेला स्वतः कसली नैतिकता आणि अनैतिकता आहे ? मदिरेचा संबंध नैतिक – अनैतिकतेशी अजिबात नाही. या तर मानवी संकल्पना आहेत आणि स्थळकाळानुसार भिन्न आहेत. तरीही आपल्याकडे मदिरा पिणारा अनैतिक असं ठामपणे शिक्कामोर्तब झाले आहे. मग अनेक क्षेत्रातील (कुठलेही क्षेत्र अपवाद नाही) अनेक मान्यवर/सामान्य नागरिक (स्री पुरुष) जेव्हा समारंभ पूर्वक/आपापल्या घरात किंवा अन्यत्र मदिरेचे सेवन करतात त्या करोडो लोकांना आपण अनैतिक घोषित करणार का ? आणि जे मदिरेचे सेवन करीत नाहीत त्या सर्वांना नैतिक म्हणावं, हाच आपला विचार आहे का ? (हिटलरने आयुष्यात मदिरापान केले नव्हते) म्हणजे मदिरेबाबतची नेमकी भुमिका काय घ्यायची हे एकदा गांभीर्याने ठरविले पाहिजे.

प्रश्न मदिरेमुळे आहे की मदिरा पिऊन गोंधळ आणि हिंसाचार करणाऱ्यांमुळे आहे ?
कौटुंबिक हिंसाचारात मदिरेला दोषी धरले जाते पण ते अर्धसत्य वाटते. अगदी मदिरेला स्पर्श न करणाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक आणि अन्य हिंसाचार केलेला दिसतो. अगदी नैतिकचे ढोल पिटणाऱ्यांनी कौटुंबीक आणि अन्य हिंसाचार केलेला दिसतो. कौटुंबिक हिंसाचारात कुटुंबाचा बळी जाऊन, नुकसान होते हे मात्र सत्य आहे. परंतु सरसकट आपण मदिरेला जबाबदार धरले तर अशा केसमधील निदान आणि उपाययोजना चुकू शकतात. असो हा स्वतंत्र विषय ठरू शकतो. आणि यावर भरपूर चर्चा झाल्या आहेत. मदिरेच्या आहारी गेलेला आणि कौटुंबीक हिंसाचार घडलेल्या केसमधे मदिरेला मधे न घेता विचार केला तर, मदिरा हे लक्षण दिसले तरी मूळ कारण वेगळीच असतात. त्याचे समाधान शोधल्यावर प्रश्नांची सोडवणूक काही मिनिटांत झाल्याचं पाहायला मिळालं.. अर्थात अशा बाबतीत अतिशय संयमाने समुपदेशन करावे लागते. मदिरा पिणारी व्यक्ती हिंसक आणि न पिणारी अहिंसक असे आपण ठामपणे म्हणू शकतो काय ? (जगातील कुठलीही हिंसा वाईटच शारीरिक असो की मानसिक). असो, आता मदिरेबाबतची भुमिका न घेता जी दांभिक चर्चा सुरू आहे त्याचे काय? अतिरेकाची सवय लागलेल्या समाजात अशीच चर्चा होणे अपेक्षित आहे. अनेक विषयांवर ती अशीच दांभिकतेतून होत राहते. मग ती चर्चा कधी कधी मांसाहार करणाऱ्यांना आरोपी करते. कधी फॅशनेबल कपडे घालून फिरणाऱ्या स्त्रियांना आणि प्रेम करणाऱ्या लोकांना आरोपी ठरवण्याचा ट्रेंड आहे. अगदी निसर्गोपचारात साखर विष आहे असे म्हटले जाते. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो मग ती गोष्ट कितीही चांगली असली तरीही.

अशा समाजात आपल्याला आता मदिरेबाबत रोखठोक भुमिका घेता येईल काय ? संपूर्ण देशातील मदिरालय आणि मदिरेची निर्मिती स्थळ (पारंपरिक आणि कारखाने) बंद करता येतील काय ? कारण कुठल्याही एका जिल्ह्यातील किंवा राज्यातील मदिरा बंदी करून हा प्रश्न आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या सुटणार नाही हे आता सिद्ध झालं आहे. बंदीच्या ठिकाणी बाहेरून मदिरा येते हा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात गुजरात आणि गोवा असा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे.

थोडं लाईटली घ्या ना..!! – मदिरा चांगली की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती घ्यायची की नाही हाही वैयक्तिक प्रश्न. पण मदिरेचा आधार घेऊन कुठलाही हिंसाचार किंवा गोंधळ करणे, गुन्हा करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही. कारण त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होऊन वातावरण बिघडते हे मान्यच करावं लागेल. मदिरा स्वतः हे बोलणार नाहीच, मदिरेला भावना नाहीत, मदिरा असो किंवा अन्य काही, आपला विवेक हरवतो तेव्हा कौटुंबिक हिंसाचार, दंगली, जागतिक युद्ध असे महाभयंकर प्रकार घडून येतात. मुळ प्रश्न उपस्थित होतो की ,आम्हाला नक्की कसा समाज हवा ? आदर्शवादी की विवेकी ? समाज मदिरामुक्त असावा की हिंसाचार मुक्त ? याचाही गांभीर्याने विचार व्हावा. विवेकाने निर्णय घेणारी, वागणारी व्यक्ती आणि समाज असावा असे मला वाटते. मदिरा चांगली की वाईट त्याचे फायदे आणि तोटे मदिरा समर्थक आणि विरोधक कोरोना संकटाआधी देखील मांडत होते आणि पुढेही मांडत राहतील . आता धोरणकर्त्या मंडळींनी योग्य निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.

विशेष सूचना – हा लेख मदिरेचे समर्थन करण्यासाठी किंवा विरोधात मत व्यक्त करण्यासाठी नाही. यात लेखकाला दिसलेली वास्तविक निरीक्षणं आहेत. त्यामुळे लेखकाचं मत हेच अंतिम सत्य नाही. मात्र लेखकाने मदिरा प्रश्नाची चर्चा विवेकाने व्हावी या हेतूनेच सदर लेख लिहिला आहे.

लोकमित्र संजय सोनटक्के हे विवेकवादी विचारांचे समर्थक असून लोक सहजीवन मिशनचे संस्थापक आहेत. मानवी नातेसंबंधांवर, ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या जीवनशैलीवर ते काम करतात. त्यांना चहाची आणि शायरीची विशेष आवड आहे. संवादातून प्रश्न सुटतात या विचाराने ते समुपदेशनाचं कामही करतात. त्यांचा संपर्क क्रमांक – 9822469495