सांगली प्रतिनिधी । अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या साडेतीन वर्षांच्या मुलगा मनन सुशांत वाझे याचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील याच्या मदतीने मननची आई प्राची सुशांत वाजे यांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा नोंद दाखल केला आहे.
सुशांत वाजे यांनी दिलेल्या आष्टा पोलिसातील फिर्यादीत म्हंटले आहे की पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. 27 जून 2021 रोजी प्राची वाजे ही मुलगा मननसह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. ती अमरसिंह पाटील यांच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली.
मनन हा मुंबई येथे मयत झाला असताना अमरसिंह पाटील व प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करून मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली. मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना वाकुर्डे येथे त्याच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून प्रेताची विल्हेवाट लावली होती. वाळवा येथे याबाबतचे निनावी पत्र सुशांत वाजे यांना आल्याने संबंधित घटनेची पूर्ण माहिती घेऊन संशयित पत्नी प्राची व तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.