नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला डॉक्टरने नांदेड शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. संबंधित महिला डॉक्टर मागच्या दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी बराच वेळ या महिला डॉक्टरने आपल्या रूमचा दरवाजा न उघडल्याने हॉटेलच्या मॅनेजरला संशय आला. यानंतर त्वरित त्याने या घटनेची माहिती वजिराबाद पोलिसांना दिली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
काय आहे नेमके प्रकरण ?
विद्या अमोल सुंकवाड असे आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्या नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होत्या. मृत विद्या यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. यानंतर 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या. त्यानंतर त्या पुन्हा आपल्या रुमवर परत आल्या होत्या. मात्र 24 मार्च रोजी सकाळी बराच वेळ झाला तरी त्या आपल्या रूममधून बाहेर आल्या नाहीत. यानंतर लॉजच्या व्यवस्थापकाने दार वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर संशय आल्याने हॉटेल व्यवस्थापकानं या घटनेची माहिती वजिराबाद पोलिसांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी हॉटेलचा दरवाजा खोलून आतमध्ये प्रवेश केला असता विद्या या मृत अवस्थेत आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत विद्या सुंकवाड यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.