बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय

Serial Killer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेंगळुरू मधील बैयप्पनहल्ली शहरातील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT) इथून सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्टेशनजवळ एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हे लक्षात घ्या कि, बेंगळुरू मधील रेल्वे परिसरातून अशा प्रकारे मृतदेह सापडल्याची गेल्या तीन महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. तसेच या हत्येमागे एखाद्या सिरीयल किलरचा हात असल्याची भीतीही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाच्या स्वयंचलित सरकत्या दरवाज्याजवळ एक ड्रम बराच वेळ तसाच पडून होता. या ड्रममधून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. ज्यानंतर, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) सदर परिसराची पाहणी केला असता संध्याकाळी 7.30 च्या सुमारास त्यामध्ये एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर पोलिसांनी अधिक तपासणी केली असता, तो मृतदेह एका महिलेचा असल्याचे निदर्शनात आले. या मृत महिलेचे अंदाजे वय 31 ते 35 दरम्यान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच स्टेशन आणि आसपासच्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एका ऑटो-रिक्षातून तीन जण तो मृतदेह घेऊन आल्याचे दिसून आले आहे. आता तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अधिक माहितीसाठी आणखी फुटेज तपासले जात आहेत.

हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये बैयप्पनहल्ली रेल्वे स्थानकावरील बंगारापेट-सर एम विश्वेश्वरैया टर्मिनल मेमूच्या अनारक्षित डब्यांपैकी एका डब्यात पिवळ्या गोणीमध्ये एका महिलेचा आणखी एक मृतदेह आढळून आला होता. याच्या एक महिन्यानंतर जानेवारीमध्येही अशाच एका घटनेत, बेंगळुरूमधील यशवंतपूर रेल्वे स्टेशनवर एका ड्रममध्ये 31-35 वयोगटातील आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला होता.

गेल्या तीन महिन्यांपासून अशा घटना घडत असल्याने आता कर्नाटक पोलिसांनी यामागे एखाद्या सिरीयल किलरचा हात असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच या घटनांचा तपास अजूनही सुरू असून पोलिसांना अद्याप याबाबत कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. आता तपास अधिकारी या तीनही घटनांमध्ये काही समानता आहे का याचा शोध घेत असल्याचे पोलिस अधीक्षक (रेल्वे) डॉ सौम्यलता एस के यांनी यावेळी बोलताना सांगितले.