नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ जून हा अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे, त्यामुळे या सामन्याच्या निकालासाठी सहावा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पण, या सामन्याचा निकाल अनिर्णित किंवा बरोबरीचा लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद देण्यात येईल, असे आयसीसीकडून जाहीर करण्यात आले.
सामन्याच्या निर्धारीत पाच दिवशी वाया जाणाऱ्या तासांची भरपाई राखीव दिवसात करण्यात येईल. हा फायनल सामना १८ ते २२ जूनला खेळवण्यात येणार आहे. आणि २३ जून हा राखीव दिवस असणार आहे. आयसीसीने हे निर्णय जून २०१८मध्येच जेव्हा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली तेव्हा घेतले होते. पाच दिवसानंतरही निकाल न लागल्यास राखीव दिवशी खेळ होणार नाही आणि सामना अनिर्णित जाहीर केला जाईल.
World Test Championship Final playing conditions announced https://t.co/ku0FTaSAeL via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) May 28, 2021
ICC ने घेतलेले महत्वाचे निर्णय
१) हा सामना ग्रेड १ ड्यूक क्रिकेट बॉलने खेळवण्यात येणार आहे.
२) बांगलादेश व श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमधील बदल WTC Finalमध्येदेखील पाहायला मिळणार आहेत.
३) शॉर्ट रन – मैदानावरील पंचांनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू तिसऱ्या पंचाकडून घेण्यात येणार आहे.
४) खेळाडूंचा रिव्ह्यू – LBWचा निकाल दिल्यानंतर कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज मैदानावरील पंचांकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालेला होता का, याबाबत विचारणा करून प्लेअर रिव्ह्यू घेऊ शकतो.
५) डीआरएस – LBW साठी स्टम्पवर आदळणाऱ्या चेंडूची उंची व लांबी यावरून अम्पायर्स कॉलचा निर्णय घेण्यात येणार आहे.