पुणे । मासिक पाळीविषयी समाजात रूढ असलेले गैरसमज, अंधश्रद्धा यामुळे स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकीकडे अशी परिस्थिती असताना ऐनवेळी आलेल्या पाळीमुळे महिलांची, मुलींची खूप अडचण होते. कधी प्रवासामध्ये पाळी येते तर कधी परीक्षा चालू असताना. अशावेळी पॅड जवळ नसेल, बाथरूमची व्यवस्था नसेल तर खूपच अडचण होते. प्रत्येक मुलीच्या किंवा महिलेच्या जीवनात मासिक पाळीमुळे असा बिकट प्रसंग ओढवतोच. अशाच प्रसंगाविषयी बिंधास्त व्यक्त व्हावं, अशा प्रसंगावर कशा पद्धतीने तुम्ही मात केली हे इतरांना समजावं याकरिता ‘समाजबंध’ संस्थेनं ‘ते पाच दिवस’ ही मोहीम सुरू केली आहे. ही अनुभव लेखन स्पर्धा नसली तरी या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलेला समाजबंधतर्फे सन्मानपत्र घरपोच दिले जाणार आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काही नियम –
लेखनासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही, मुक्तपणे लिहा आणि लिखाणाला योग्य शिर्षक द्या.
एकपेक्षा अधिक अनुभव तुम्ही लिहू शकता.
तुमचा अनुभव टाईप करून 7709488286 या whatsapp क्रमांकावर पाठवा.
टाईप करणं शक्यच नसेल तर कागदावर लिहून त्याचा फोटो पाठवलात तरी चालेल.
सोबत आपलं नाव, नंबर, पत्ता, email व फोटो पाठवावा. १५ जून पर्यंत तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता.
तुम्ही लिहून पाठवलेले अनुभव वाचून त्या परिस्थितीत कुठे काही सुधारणा करता येऊ शकतील यावर समाजबंध टीम एक अहवाल बनवेल. सर्व अनुभवांना एकत्रित करून त्याचं एक ई-बुक बनवलं जाईल आणि सोबतच निवडक अनुभवांना विविध माध्यमात/ समाज माध्यमात प्रकाशित केलं जाईल. आपला हा वाईट अनुभव इतर मुली-महिलांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरू शकतो! समाजबंध ही सामाजिक संस्था ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन, पाळीविषयक अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करते. तसेच कापडी आशा पॅड निर्मितीच्या प्रशिक्षणाचे काम करते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.