नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 18 ते 22 जून यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवण्यात येणार आहे. या फायनलबाबत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकर यांने कोणत्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे, याबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर
या फायनल सामन्याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला, ” भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल होणार आहे, हे यापूर्वीच ठरलेल होते. पण त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका कशी खेळवण्यात आली. जर ही मालिका खेळवायची होती, तर ती फायनलपूर्वी खेळवायला हवी होती. त्यामुळे या कसोटी मालिकेचा फायदा न्यूझीलंडच्या संघाला भारताविरुद्धच्या सामन्यात मिळू शकतो. कारण इंग्लंडमध्ये त्यांनी दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यांनी ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तर न्यूझीलंडचे पारडे हे भारतापेक्षा जड वाटत आहे. कारण भारतीय संघाला इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर आपल्या संघातील खेळाडूंबरोबर सामना खेळायला मिळाला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला जर दोन्ही संघांकडे पाहिले तर नक्कीच भारतापेक्षा न्यूझीलंडचा संघ वरचढ दिसत आहे. पण भारतीय संघ हा चांगलाच तुल्यबळ आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच सचिन पुढे म्हणाला, ” इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जी कसोटी मालिका खेळवण्यात आली त्याचा फायनलशी कोणताही संबंध नव्हता. कारण फायनल कोणत्या संघांमध्ये होणार, हे फार पूर्वी जाहीर करण्यात आले होते. यानंतर हि मालिका खेळवण्यात आली आहे. या गोष्टीचा फायदा न्यूझीलंडला होऊ शकतो.पण भारतालादेखील कमी लेखून चालणार नाही. कारण टीम इंडियाने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. यामुळे फायनलचा सामना चांगलाच रंगतदार होईल, अशी आशा मला आहे.” असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल ठरली होती तर त्यानंतर त्यांची इंग्लंडबरोबर मालिका का खेळवण्यात आली, हा प्रश्नही चाहत्यांना पडलेला आहे. पण तरीदेखील या मालिका विजयाचा त्यांना जास्त फायदा होणार नाही, असे चाहत्यांना वाटत आहे.