संसार सुरू होण्याआधीच मोडला; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊन, नोकरी, व्यवसाय, कर्जाचं ओझं अशा विविध कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना चंद्रपूरातील एका तरुण व्यावसायिकाने व्हॉट्सअ‍ॅप ला स्टेटस ठेवत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचे नाव संदीप चौधरी असे आहे. मृत संदीपचे चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे स्वतःचं मिठाईचे दुकान आहे. यादरम्यान शुक्रवारी दुपारी त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर ‘बाय बाय’ स्टेटस ठेवून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संदीपचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहून त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.तर काहींनी संदीपच्या घरी धाव घेतली पण त्याच्या आधीच संदीपचा मृत्य झाला होता. सर्वकाही सुरळीत सुरू असताना संदीपने अचानक अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी संदीपने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नव्हती. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 2 जुलै रोजी संदीपचा 25 वा वाढदिवस होता. यादिवशी तो चांगलाच आनंदात होता अशी माहिती मित्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच त्याचे लग्न ठरले होते. पण संदीपने आत्महत्या केल्यानं त्याचा संसार सुरू होण्याआधीच तुटला आहे. व्हॉट्सअ‍ॅप वरील स्टेटस पाहून मित्र घरी पोहोचेपर्यंत संदीपने आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केला होता. संदीपच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. संदीपनं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अद्याप कुटुंबीयांनाही समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like