कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खांबावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंद्रजित लालासाहेब थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कराड) असे त्याचे नाव आहे.
आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन हे तिघेजण सोमवारी, दि. २९ सकाळी आणे येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी रोहित्र बंद करून कोळेवाडी येथून आलेला विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरूस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र, तांबवे येथील सबस्टेशनवरून त्या वाहिन्यांना वीज पुरवठा सुरूच होता.
परिणामी, बिघाड दुरूस्तीसाठी खांबावर चढलेल्या इंद्रजितला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो खांबावरुन खाली फेकला गेला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सहकाºयांनी तातडीने त्याला कराडच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार असणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिला. खांबावर वीज पुरवठा सुरू असतानाही बंद असल्याचे सांगुन इंद्रजितला खांबावर चढण्यास सांगण्यात आले. या निष्काळजीपणामुळेच इंद्रजितला जीव गमवावा लागला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. अखेर पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा | Facebook Page