जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग’ असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. घरचे आपल्या लग्नाला विरोध करतील म्हणून हे दोघे गावातून पळून गेले होते. मुलीच्या आईवडिलांनी हाच राग मनात धरून मुलाच्या घरच्यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पुढील चौकशी सुरु आहे.
हि घटना जालना जिल्ह्यातील सेलगाव या ठिकाणची आहे. यामध्ये 35 वर्षीय पीडित महिला सोमवारी सायंकाळी आपल्या घरासमोरील ओसरीत बाजेवर झोपली असताना गावातील सोपान श्रीमंत लिपणे हा व्यक्ती पीडितेच्या घरी आला. त्यावेळी त्याने पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुझ्या पुतण्याने आमच्या मुलीला पळवून नेलं आहे; तो कुठे आहे? सांग म्हणत आरोपीने पीडितेला बेदम मारहाण केली आहे.
यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत घरासमोरील दुचाकीचे नुकसान केले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी सोपान श्रीमंत लिपणे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार एस बी बिक्कड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.