सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भारती विद्यापीठाचे संस्थापक, राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांच्या कुटूंबियाबद्दल बंडातात्या कराडकर यांनी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने विश्रामबाग पोलिसांकडे करण्यात आली. नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बंडातात्या कराडकर या संत समाजातील तथाकथित नेत्याने सातार्यातील कार्यक्रमात वाईन बंदीच्या आंदोलना दरम्यान अर्वाच्य भाषेत बदमानी केली आहे. यावेळी पतंगराव कदम कुटूंबियाबाबतही त्यांनी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
गेली कित्येक वर्षे कदम कुटूंबिय शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी अनेक गोरगरिबांना आधार दिला आहे. अशा कुटूंबियांची बदनामी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कदापिही खपवून घेणार नाही. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, शिवाजी मोहिते, अमर निंबाळकर, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.