पुणे प्रतिनिधी | प्रेम आंधळे असते. ते काय करायला भाग पाडेल, याचा काही नेम नाही. अशाच तीन प्रेमवीरांनी प्रेयसीला फिरवण्यासाठी स्वतःकडे गाडी नसल्याने एक ना दोन तर तब्बल चौदा दुचाकी गाड्या चोरल्या. पण पोलिसांनी बरोबर माग काढून तिघांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अशाप्रकारे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत.
हिमांशू उर्फ पप्प्या योगेश सोळंखी वय 20. रा.गुरुद्वारा मार्ग, दिघी निखिल उर्फ सोनू संतोष जाधव वय 20,रा.दिघी गावठाण आशिष उर्फ आश्या रोहिदास जाधव वय 21, चौधरी पार्क, दिघी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तळेगाव दाभाडे परिसरामध्ये गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, तीन इसम सोमाटणे फाटा येथील अन्नपूर्णा हॉटेल जवळ एका स्कुटीवर येणार आहेत. त्यांचेकडे असलेली गाडी चोरी केलेली आहे. पोलिसांनी परिसरात सापळा रचून शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोपेड दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.