रायगड । सतिश शिंदे
पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारकोपर ता.पनवेल येथे केले. नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा आज खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा खारकोपर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.
विविध सेवांचे लोकार्पण
यावेळी नेरुळ सीवूडस दारावे/ बेलापूर-खारकोपर (फेज १) नवीन लाईन व पनवेल-पेण विद्युतीकरण कार्याचे उद्घाटन, बेलापूर/नेरुळ-खारकोपर विभागातील ई एम यु सेवेचे उद्घाटन, वसई रोड-दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेचे उद्घाटन, उंबरमाली व थानसीत येथे नवीन उपनगरीय स्थानकांची पायाभरणी तसेच परळ स्टेशन नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी, मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा, घाटकोपर येथे नवीन ओव्हरब्रिज, सर्वच २७३ उपनगरीय रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मची उंची ९०० मिमी ने वाढवली २३ स्थानकांवर ४१ एक्सलेटर्स, ६ स्थानकांवर १० लिफ्ट, ६ स्थानकांवर नवीन शौचालय, ७७ स्थानकांवर ३१८ एटीव्हीएम सुविधा, ६ स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, भिवंडी रोड-नावडे रोड येथील २ नवीन बुकिंग ऑफिसेस, सानपाडा ईएमयू कारशेड येथे १ मेगा वॅट सौरऊर्जा प्रकल्प या विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
खारकोपर रेल्वेस्थानक आवारात आयोजित या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्या सह केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, बंदरे, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, खासदार सर्वश्री श्रीरंग बारणे, राजन विचारे, अरविंद सावंत, आमदार संदीप नाईक, मंदाताई म्हात्रे, मनोहर भोईर, रमेश पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) एस. के. तिवारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, पनवेल महापौर कविता चौतमोल, रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, लोकनेते दी.बा. पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, तसेच रेल्वे, सिडको प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
रिमोट कंट्रोल व व्हिडीओ लिंकद्वारे लोकार्पण
यावेळी रिमोट कंट्रोलद्वारे विविध सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेचे उद्घाटन करण्यात आले. तर व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून खारकोपर – बेलापूर लोकल रेल्वेसही रवाना करण्यात आले.
पनवेल ठरणार महत्त्वाचे टर्मिनस
यावेळी बोलतांना श्री.फडणवीस यांनी, वेळेच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्याने समाधान वाटत असल्याचे नमूद करुन सिडको, रेल्वेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मुंबई सह कोकण परिसराचा विकास करतांना आता महामुंबईचाच विचार करावा लागेल त्यात एमएमआरडीए अंतर्गत येणारा भाग, मुंबई, नवी मुंबई या क्षेत्राचा एकत्र विचार करावा लागेल. ते म्हणाले की, सन २०१४ नंतर राज्यात रेल्वे मार्ग मंजुरी, दुहेरीकरण, विद्युतीकरण या कामांना केंद्राकडून मान्यता मिळाल्याने ही कामे होण्याच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सेवांच्या पुर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. नवी मुंबईच्या दक्षिण भागातील या विकासाची भविष्यातील वाढ ही रायगड जिल्ह्यात होत आहे. त्यादृष्टीने पनवेल हे भविष्यातील महत्त्वाचे टर्मिनस ठरणार असून त्यादृष्टीने आम्ही विकासाचे नियोजन करीत आहोत. याच परिसरात मेट्रो, उपगरीय रेल्वे सुविधा व ट्रान्स हार्बर लिंकच्या धर्तीवर विकास करण्यासाठी केंद्राकडून राज्याच्या १२ हजार १६७ कोटी रुपयांच्या दळणवळण सुविधा विकास प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. त्यात ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकार योगदान देणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या उन्नत रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. याचा विस्तार करतांना येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाच्या दृष्टीने हा समग्र दळणवळण प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्यात ३६० डिग्री दळणवळण सुविधा निर्मितीसाठी नियोजन होत आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीनेही वेग घेतला आहे. या ठिकाणी उपनगरीय रेल्वे सुविधांचे जाळे उभे करत असतांना सिडकोमार्फत स्टेशन जवळ ४० हजार घरांच्या उभारणीचे नियोजन आहे. तर या जवळपासच्या परिसरात २ लाख घरांचे नियोजन करण्यात आले आहे. निवासाची सोय जर स्टेशनपासून जवळ असेल तर सामुहिक दळणवळण सुविधांचा वापर वाढतो, असेही प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ही विकासकामे करत असतांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ‘ज्यांनी जागा दिली म्हणून नवी मुंबई उभी झाली’, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यांच्या मागणीनुसार क्लस्टर म्हणून विकासाचा प्रयत्न होत आहे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
प्रवाशांच्या सुविधांसाठी क्षमता विकास – रेल्वेमंत्री पियुष गोयल
आपल्या भाषणात रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, केंद्र आणि राज्य मिळून विकासाचे डबल इंजिन काम करीत आहे, म्हणून गतीने विकास होतोय. दिवा पेण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम ९ महिने आधीच पूर्ण केले. महामुंबई क्षेत्रातील नागरिकांना व रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे क्षमता विकास करीत आहे. केंद्र, राज्य शासन, प्रशासन आणि स्थानिक जनतेचा सहभाग अशा सामुहिक प्रयत्नातून विकासाचे काम होत आहे, याबद्दल श्री.गोयल यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, रेल्वेप्रवाशांना चांगली सुविधा देता यावी यासाठी 200 नवीन वातानुकूलित रेल्वे गाड्यांची उपलब्धता लवकरच करण्यात येईल. मुंबई व नवी मुंबई भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दळणवळणाची चांगली सुविधा देण्यात या रेल्वे सेवेची मोठी भूमिका असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण सर्व मिळून लोकांच्या सुविधेसाठी रेल्वे सुविधांचा विकास करू या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
मुंबई सोबत रायगडचा ‘महामुंबई’ म्हणून विकास करा – अनंत गिते
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यावेळी म्हणाले की, उपनगरीय रेल्वे सुविधांचा विकास करतांना त्यात रायगड जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा समावेश होत आहे ही समाधानाची बाब आहे. ही रेल्वेसेवा आज पेण पर्यंत विस्तारत असली तरी रोह्या पर्यंत उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही सेवा रोह्यापासून सुरु करता येईल, असे गिते यांनी सांगितले. ते म्हणाले की, ही सुविधा अलिबाग पर्यंत नेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यातून लवकरच पेण अलिबाग रेल्वेने जोडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दळणवळण सुविधा विकासासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून वडखळ ते अलिबाग चौपदरी रस्ता काम सुरू आहे. या दळणवळण सुविधांमुळे सर्व परिसराचा एकसंघ विकास होईल आणि त्या विकासाचे खारकोपर हे मध्यवर्ती केंद्र असेल याबद्दल गिते यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की रेल्वे सर्वाधिक स्वस्त, सुरक्षित,जलद प्रवास सुविधा देते त्यामुळे ‘महामुंबई’ चा विकास होतोय. या विकासाच्या कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले व पनवेल विस्तारीकरणासाठी ही सिडकोने पुढाकार घ्यावा,असे आवाहनही केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत भाषण केले. ते म्हणाले की, विकासाची कामे करतांना प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे सरकारचे धोरण आहे.
सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी बोलतांना उलवे नोड परिसराची आज खरी दिवाळी असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, दळणवळण सुविधांचा विकास करतांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कामांचा वेग आणि दर्जा याबाबत अभिमान वाटावा असे सिडकोचे काम आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही आम्ही याचे वेगाने आणि वेळेत पूर्ण करू, असे श्री.ठाकुर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर चीफ अॅडमीन ऑफिसर एस के तिवारी यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे :
नेरूळ ते खारकोपर मार्गावर उद्या सोमवार दि.१२ पासून नियमित सेवा सुरू होणार.
नेरूळ-खारकोपर-नेरूळ आणि बेलापूर-खारकोपर-बेलापूर अशा अप व डाऊन मिळून २०-२० फेऱ्या दररोज होणार आहेत.
नेरूळपासून निघणारी ट्रेन सीवूडस-दारावे, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांवर थांबेल,
तसेच बेलापूर येथून निघालेली ट्रेन बामणडोंगरी, खारकोपर या मार्गे जाईल.
नेरुळ सीवूडस/बेलापूर- उरण रेल्वे मार्ग वैशिष्ट्ये
दक्षिण नवी मुंबई चा विकास जलद होण्यासाठी हा मार्ग सिडकोने विकसित केला
या दुहेरी रेल्वेमार्गाची लांबी २७ किमी
प्रकल्प खर्च सिडको ६७ % व मध्य रेल्वे ३३%
टप्पा १- सीवूडस ते खारकोपर आणि बेलापूर ते सागर संगम(१२ किमी)
टप्पा २- खारकोपर-गव्हाण-रांजणपाडा- न्हावाशेवा-द्रोणागिरी-उरण (१५किमी)
एकूण स्थानके १०
पहिल्या टप्प्यात ५ तर दुसऱ्या टप्प्यात ५ स्थानकांची निर्मिती
दुहेरी बाजूनी चढता उतरता येणाऱ्या २७० मी लांबीचे प्लॅटफॉर्म
४ रोड ओव्हर ब्रीज
१५ पुलाखालील रस्ते
४ मोठे पूल
७८ लहान पूल
१ पुला खालील रेल्वेमार्ग
दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार