नागपूर प्रतिनिधी | जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आणि यावरून खुद्द पवार यांनी सूचक असे वक्तव्य केले आहे.
नागपुरात सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवीन वर्षापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. मात्र त्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ते याबाबत निर्णय घेतील. या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची शपथ कोण घेतील याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील. आमच्या पक्षात कोणाला उपमुख्यमंत्री करायचं हे शरद पवार ठरवतील. उद्धवजींनी मनात आणलं तर ३१ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. विस्ताराबाबत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं अजित पवारांनी नमूद केलं.
“शेतकऱ्यांबाबत हे सरकार सकारात्मक आहे, विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी चांगला निर्णय ऐकायला मिळेल, असं अजित पवार म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, हेक्टरी 25 हजाराची घोषणा होऊ शकते का असे प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आले.
त्यावर अजित पवार म्हणाले, “मी शासनाचा घटक नाही. मी मंत्रीही नाही. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पक्षाने पुढाकार घेतला आहे. आम्ही पहिल्यापासूनच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक आहोत. त्यामुळे ज्या गोष्टी सभागृहात बोलायच्या असतात, त्या बाहेर बोलणं योग्य होणार नाही. मला वाटतं शेतकऱ्यांबाबत आज चांगला निर्णय होईल, असं माझं मन मला सांगतंय”
कर्जमाफीची घोषणा होणार नाही असं कोण म्हणतं? तसंच आजच कर्जमाफीचा निर्णय होईल असंही कोण म्हणतं? आज काहीही होऊ शकतं, असं म्हणत अजित पवारांनी संभ्रम निर्माण केला. विदर्भात अधिवेशन असल्यामुळे, विदर्भातील आणि राज्यातील शेतकऱ्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधीच म्हणाले आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.
आजपर्यंची परंपरा आहे की अधिवेशनातून काहीतरी घोषणा होऊ शकते. लोकांचं लक्ष असतं, पॅकेज काय मिळतं. त्यामुळे उद्धवजी प्रमुख असल्यामुळे त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. सकारात्मक ऐकायला मिळेल, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, सिंचन घोटाळ्याबाबत जी क्लीन चिट मिळाली त्याबाबत नो कॉमेंट एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात कडाडून विरोध केला जात आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळन लागले. त्यावर प्रतिक्रिया देतांना पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षाने अथवा संघटनेने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, त्याचे राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.