कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : कोल्हापूरात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज सुरू झालीय. पालकमंत्री सतेज पाटलांच्या विरोधात कॉंग्रेसचेच आमदार पी.एन. पाटील गोकूळच्या रिंगणात उतरले आहेत. सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक महादेवराव महाडिक परिचित आहेत. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीत पी एन पाटील हे महादेवराव महाडिक यांच्या सोबत गेल्यामुळे एप्रिलमध्ये होणारी निवडणूक रंजक झाली आहे. गोकुळसाठी ठराव गोळा करण्याच्या निमित्तानं पालकमंत्री सतेज पाटील यांना शह देण्यासाठी महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय.
कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळच का आहे महत्व?
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ या दूध संघाचा नुसता कोल्हापुरातच दबदबा नाही तर कर्नाटक ,गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच राजकारण ही याच गोकुळ भोवती फिरत असत. गोकुळ ची निवडणूक एप्रिल महिन्यात आहे. परंतु आज पासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झालीय असं म्हणता येत आहे कारण गोकुळचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी गोकुळच्या कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क या मुख्य कार्यालयात एकत्र येऊन 2240 ठराव गोळा केले आहेत. गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्यात धुसफूस सुरू असल्याचं चित्र समोर आलं होत.अखेर मंत्री पद न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचा सतेज पाटील यांच्या विरोधातला पहिला शड्डू ठोकला आहे.
गोकुळ काय आहे?
गोकुळ ही शेतकऱ्यांची संस्था आहे. आजवर गोकुळ शेतकऱ्यांच्या विकासासाठीच काम करीत आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे शेतकरी सभासद आम्हाला निवडून देतील असं काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी म्हटले आहे तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू ज्यांचे गैरसमज झाले आहेत. त्यांचे गैरसमज देखील दूर करू असे त्यांनी म्हटले आहे. आज सकाळी जवळपास दहा वाजल्यापासून कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क बसणाऱ्या गोकुळच्या मुख्य कार्यालयात ठराव देण्यासाठी जिल्ह्यातील सभासदांनी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळेस भाजपा ,शिवसेना आणि काँग्रेसचे काही प्रमुख नेते मंडळी एकत्र येऊन ठराव दिले महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
दरम्यान गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून आज तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील , अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्ररीत्या सहायक दुग्ध उपनिबंधक यांच्याकडे ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधारी गटाला जबर धक्का बसला आहे. त्यामुळे एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस रंगणार आहे.