सोलापूर प्रतिनिधी | समाजात आजही जन्माला आलेल्या मुलीचा तिस्कार केला जातो. अनेक वेळा मुलींचा जीव गर्भातच घेतला जातो. अशा वेळी समाजात मुलींविषयी जागृती निर्माण व्हावी. त्याच बरोबर तिचा सन्मान देखील व्हावा या सामाजिक जाणीवेतून सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव येथील विजयसिंह देशमुख व जयसिंह देशमुख यांनी आज चक्क हेलिकाॅप्टरमधून आपल्या मुलीची विवाहसाठी सासरी पाठवणी केली. पाठवणीचा हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती.
हवसेला मोल नसतं असं आपल्याकडे म्हटलं जातं. परंतु हौसे बरोबरच मुली प्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम देखील देशमुख कुटुंबियाने दाखवून दिला आहे. कासेगाव येथील शेतकरी विजयसिंह देशमुख यांची पुतणी आणि जयसिंह देशमुख यांची मुलगी मंजुळा ही उच्चशिक्षीत असून तिचे बीडीएस पर्यंतचे शिक्षण झाले आहे. पहिल्यांपासूनच मुलींवर प्रेम करणारे आणि महिलांचा सन्मान करणारे कुटुंब म्हणून देशमुखांची कासेगाव परिसरात ओळख आहे.
मंजुळा हिचा उद्या उस्मानाबाद येथे विवाह सोहळा आयोजित केला आहे. या विवाह सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियाने आज आपल्या मुलीचा सन्मान म्हणून तिची चक्क हेलिकाॅप्टरमधून उस्मानाबाद येथे सासरी पाठवणी केली. मुलीच्या पाठवणीचा हा आगळा वेगळा आणि भावनिक सोहळा पाहण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.
पहा व्हिडिओ रिपोर्ट