मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय राऊत यांनी आज संभाजी भिडे यांना टोला लगावला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भिडे गुरुजींनी असं कळवलंय का की मुख्यमंत्रिपदाबाबत लेखी पत्र घेऊन मी मातोश्रीवर जातोय. तसे असेल तर मला सांगा मी तसा निरोप उद्धवजींना देतो असं म्हणत राऊत यांनी आपण आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचं सांगितले.
तसेच कोणीही कोणत्याही प्रकारची मध्यस्ती करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे हे त्यांच्या भुमिकेवर ठाम आहेत. हा प्रश्न भाजप आणि शिवसेना यांच्यामधील आहे. यात तिसर्या कोणी पडण्याची आवश्यकता नाही असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले