सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
‘विधानसभेसाठी तासगाव कवठेमंकाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथं शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील’ असे ठणकावत जागा शिवसेनेकडे असताना तुम्ही भांडताय कशाला? असा सवाल शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केला.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा मेळावा आज तासगावात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, जेष्ठ नेते अरुण खरमाटे, छायाताई खरमाटे, तासगाव तालुकाध्यक्ष अमोल काळे यांसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना बानगुडे पाटील म्हणाले राज्यात युती जरी झाली तरी ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे येथील उमेदवार हा शिवसेनेचा असणार आहे. यासाठी इतर पक्षातून येणाऱ्या उपऱ्याना संधी दिली जाणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळेल असे ते म्हणाले. शिवसेना सत्तेत जरी असली तरी तिचा सत्तेतला वाटा कमी होता. आम्ही विरोधक म्हणूनही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. तासगाव तालुक्यात दुष्काळ पाण्याचा आणि सत्तेचा हे आता आम्ही चालवणार आहोत असे प्रतिपादन बानुगडे-पाटील यांनी केले.