सांगली प्रतिनिधी। राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ नावाने अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये ६८ अधिकारी, ५३३ पोलीस कर्मचारी आणि १६२ होमगार्ड सहभागी झाले होते.
यामध्ये ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. न्यायालयातून वॉरण्ट निघाले असतानाही पोलिसाना चकवून राहत असलेल्या ४ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्या ५२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बीपी ऍक्ट ११०,११२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल, टपरी, हातगाडे, ढाबे सुरु ठेवणाऱ्या २१ जणांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना देशीदारू विक्री करणाऱ्या १२ जणांवर दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील हिस्टरी शिटर असणारे ९६ आरोपी तपासले. जामीनपात्र व अजामीन पात्र वॉरण्ट अशा ४५ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. फरारी असणारे ८ आरोपी तपासण्यात आले. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ३८ वाहनधारकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. हद्दपारीची कारवाई केली असतानाही पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्यात आलेल्या तिघाजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मपोका कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. मोटार अधिनियमाच्या आधारे ४४३ केसेस करून त्यांच्याकडून एकूण ८८ हजार ९०० चा दंड वसूल करण्यात आला. ऑपरेशन ऑलआऊट ही मोहीम यापुढील काळातही राबवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.