कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग – व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आला होता.
ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडला. एक हजार पेक्षा अधिक घरे या पुरामुळे धोकादायक बनली आहेत. ३५० यंत्रमाग कारखाने बाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा ,अंगणवाडी ,आरोग्य केंद्रे यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा फटका बसला आहे. या पुरामुळे चार लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे. साखर कारखानदारीचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे कित्येक हजारो कोटी रुपयांचे नुकसान हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योजकांचे झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल बेहाल होत आहेत. या पूरग्रस्तांचा सध्या आक्रोश सुरू आहे. आज पर्यंत पूरग्रस्तांना मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आहे. याचं कारणास्तव आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चामध्ये शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक यांच्यासह पूरग्रस्त असलेले सामान्य नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नेतृत्व केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सरकार मदत करत असताना मोर्चाद्वारे शिमगा करून काही साध्य होणार नसल्याची’ मोर्चावर टीका केली होती. त्याला राजू शेट्टी यांनी उत्तर देतांना ‘शिमगा करण्याची वेळ कोणी आणली?’ असा प्रति सवाल करत ‘कधी हातात खुरपे घेऊन शेतात काम केलं असतं तर या मोर्चाची गरज त्यांना समजली असती’ अशा शब्दांत पाटील यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याचं लागतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. मोर्च्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चाद्वारे केलेल्या मागण्या आता सरकार पूर्ण करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.