मुंबई प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये तीनही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक काल पासून ठप्प होती. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले होते. तसेच अतिवृष्टीमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आज सकाळ पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटांनी, तर हार्बर सुमारे ४० मिनिटे विलंबाने होत आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा सकाळपासून सुरळीत सुरु झाली आहे. सीएसएमटी-पनवेल लोकल सेवाही सुरू झाली आहे . सीएसएमटी-ठाणे लोकलसेवा संथ गतीने सुरू आहे. सीएसएमटी वरून अंधेरीसाठी लोकल रवाना झाली असून सीएसएमटीहून अंबरनाथला पहिली लोकल रवाना झालीय. मध्य रेल्वेनं ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. सीएसएमटी ते गोरेगाव, कुर्ला ते कल्याण मार्गावरील लोकल सुरू झाली आहे. चर्चगेटहून विरारकडे जाणारी जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू झाली आहे. मात्र कुर्ला स्थानकाबाहेर अजूनही रूळांवर पाणी आहे.