पुणे प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसनेत प्रवेश केला. मात्र तरीही सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आता दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे .
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसेच उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं.
पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक या सारख्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.