नवी दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला. विखेंच्या राजीनाम्याचा विचार योग्य वेळी घेतला जाईल असे हायकमांकडून सांगण्यात आले आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते.
राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव वाढला होता. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्याबाबत विनंती केली होती. मात्र अहमदनगर मध्ये लोकसभेची जागा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्याने सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सुजयच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी शरद पवारांवर त्यांनी अनेक आरोप केले होते. तसेच, नगरमध्ये सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मात्र सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे आपली नैतिक जबाबदारी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत होते. अखेर आज त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवला.
इतर महत्वाचे –
दाऊद इब्राहीम प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केले हे आरोप…
नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…