परभणी प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर उभे करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी आणि हेक्टरी लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परभणी मध्ये केली आहे. परभणी येथे आयोजित मोर्चासाठी शेट्टी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे.
‘केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत असून अतिवृष्टीच्या संदर्भात मिळणारी मदत ही अद्याप मिळालेली नाही. कर्नाटक, केरळ या राज्यांना केंद्र सरकारने मदत दिली असून महाराष्ट्रात आलेल्या पूर परिस्थितीलाही अद्याप काहीही मदत मिळाली नाही. त्यामुळे केंद्रात बसलेले सरकार, महाराष्ट्राला उपेक्षित वागणूक देत नाही’ असा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला.
‘राज्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजला असून अनेक भागांमध्ये अद्यापही पंचनामे सुरू झालेली नाहीत. त्यात सरकार जरी म्हणत असले की हे पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील तरी विमा कंपनी मात्र वेगळीच भूमिका घेत आहे. आणि त्यामुळे विमा कंपनी शेतकर्यांना गंडविण्याच्या प्रयत्नात आहे’ असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान वरील वक्तव्य करणाऱ्या ‘विमा कंपनीला धडा शिकवू’ असा गर्भित इशाराही देखील यावेळी राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.