सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती आखली आहे. सद्यस्थितीत या जागांवर सेनेकडे सक्षम उमेदवार नाहीत , मात्र या जागांवर सेनेने दावा केल्याने भाजपची सध्या कोंडी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत युतीच्या संभ्रमावरुन तणाव वाढणार असल्याचे चित्र दिसते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेना युतीचा विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्केचा फॉर्म्युला ठरलेला होता , परंतू विधानसभेच्या तोंडावर तो फॉर्म्युला भाजपकडून अमान्य करण्यात आला. सध्या जागा वाटपाबाबतची चर्चा सुरुच आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. भाजपकडून 165 आणि 105 असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र सेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.