व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, दुकानांना 50 हजारांची मदत;अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठा फटका जनतेला सहन करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत पूरग्रस्त जनतेला तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ज्या दुकानदारांची दुकाने पाण्याखाली गेली आहेत त्यांनाही ५० हजारांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून विधानपरिषदेच्या सभागृहात बोलताना अजित पवारांनी या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांना १० हजारांची मदत, दुकानाचे नुकसान झालेल्या नागरिकाला ५० हजारांची मदत. तसेच मृतांच्या कुटुंबाना ४ लाखाची मदत करणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केलं. तसेच पुरात नुकसान झालेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणार अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिली. यापूर्वी पूरग्रस्तांना ५००० रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता . मात्र यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आल्याने पुरात नुकसान झालेल्या जनतेला थोडाफार दिलासा मिळेल.

ज्याची लहान टपरी आहे त्या नुकसानग्रस्त दुकानदाराला १० हजारांची मदत केली जाईल. सरकार कोणतीही निधीची कमतरता भासू देणार नाही असे अजित पवारांनी स्पष्ट केलं. भंडारा जिल्ह्यात वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाना उद्यापर्यंत मदत करण्यात येईल. अतिवृष्टी मुळे होणाऱ्या नुकसानीवर सरकारचे लक्ष्य असून बाधितांना योग्य मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असेही अजित पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची गरज आहे अशावेळी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देणं, आणि शेतकऱ्यांच्या इतरही काही मागण्या आहेत त्याबाबत मदत करणे यासाठी शासन कटिबद्ध आहे असे त्यांनी म्हंटल