हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर आज त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
वकील प्रशांत कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आव्हाड यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं त्यांनी म्हंटल. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपण स्वतःहून चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आलो आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितलं. दरम्यान, कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्या नंतर आव्हाडांकडून जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी ३ वाजता त्यावर सुनावणी पार पडेल.
नेमकं काय आहे प्रकरण –
ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहामध्ये सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू होता. शो सुरू असताना, अचानक जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहामध्ये गेले आणि या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत शो बंद पाडला. चित्रपटाचा शो बंद झाल्याने प्रेक्षक चित्रपटगृहातील स्क्रीनजवळ जमले. त्यावेळी कोणीतरी चित्रपट बंद पाडत आहात तर आमचे पैसे परत देण्याची मागणी केली. त्यांनतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी काही प्रेक्षकांना मारहाण केल्याची तक्रार ठाण्यातील व्यावसायिक परीक्षित दुर्वे यांना केली होती.