धक्कादायक ! अनैतिक संबंधातून 28 वर्षीय तरुणाची हत्या

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये समता नगर परिसरात राहणाऱ्या सागर नरेंद्र पवार या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पहाटे पावणे तीन वाजता घरातच त्याच्यावर हल्ला झाला. त्याच्यावर पोती उचलण्याच्या हूकने वार करण्यात आले. अमित खरे, असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत सागर नरेंद्र पवार याचे आरोपी अमित खरे याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते, त्यातून हा खून झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी तसेच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. अमितने शनिवारी पहाटे सागरच्या घरी जात त्याच्यावर शस्त्राने वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची अधिक प्रकृती खालावल्याने सागरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. मृत सागर हा समतानगरात एकटाच राहत होता. मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.