केंद्रानं राज्याचे साडे 30 हजार कोटी थकवले, तरी आम्ही पेन्शन आणि पगार दिलेत; अजितदादांनी टोचले भाजपचे कान

मुंबई । केंद्राने अजून राज्याचे 30 हजार 537 कोटी दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सरकार आणि जनता मिळून कोरोना चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. नंतर मात्र प्रत्येक राज्याने हा खर्च करावा, असं सांगितलं.

संकट मोठं होतं, उत्पन्न कमी झालं होतं. मंदिरं सुरू करण्यासाठीही राजकारण केलं गेलं. विरोधी पक्षनेते सांगतात राजकारण करायचं नाही, पण त्यांच्याच सहकाऱ्यांनी राजकारण केलं अशी टीका अजितदादांनी यावेळी विरोधांवर केली. इंग्लंडला दोन-दोनदा लॉकडाऊन करावं लागलं. उद्या काही निर्णय घेतला आणि अंगाशी आला तर विरोधकच म्हणणार यांना थांबता येत नव्हतं का, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे. केंद्राकडून वेळेत निधी आला नाही. जे जे विधिमंडळाने मागितलं आहे. त्यात कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगेटिव्ह प्रेशरसाठी 22 कोटी 26 लाख रुपये खर्च केले. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवासस्थानासाठी 8 कोटी रुपये दिले आहेत.

इतकी सगळी संकटं असताना वर्षभरात निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे. त्याच्यानंतर अतिवृष्टीचं संकट आलं. आपल्याही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. आम्ही कधीही भेदभाव केलेला नाही. शेवटी शपथ घेतल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत एक राज्य आहे. मागच्या पाच वर्षांत कुठे, कधी निधी गेला हे मी पुढच्या अधिवेशनामध्ये सांगेन. वडेट्टीवारांनी जे जे प्रस्ताव आणले, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केलेले आहेत. धानालासुद्धा आपण 700 रुपये बोनस दिला. 2500 रुपये एकूण देण्याचा प्रयत्न केला. 2850 कोटी रुपये धान खरेदी करण्यासाठी ठेवलेले आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच आमदार निवास असलेला मनोरा बांधत असून, त्याचं लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. तसेच त्याला निधी अपुरा पडणार नसल्याचंही नाना पटोलेंनी माहिती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’