सोलापूर : महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत अक्कलकोट रोडवरील मुद्रा सनसिटी येथे ड्रेनेज स्वच्छतेचे काम सुरु होते. ब्लॉक झालेला ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी उतरलेला एक कामगार खूप वेळ होऊनही परत येत नसल्याने दुसरा कामगार आतमध्ये उतरला. त्या दोघांना वाचविण्यासाठी पुन्हा एकापाठोपाठ चौघे उतरले. मात्र, त्यातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
शहरातील विविध ठिकाणी दास कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाईन टाकली जात आहे. हद्दवाढ भागात 2016 पासून ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले होते. ते काम अतिशय संथगतीने सुरु असून तब्बल पाच वर्षात 297 किलोमीटरपर्यंत काम होणे अपेक्षित आहे.
मात्र, आतापर्यंत केवळ 50 टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते अर्धवट खोदून ठेवण्यात आले आहेत. त्याबद्दल अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यांनतर महापालिका आयुक्तांनी मक्तेदाराला नोटीसही बजावली. त्यानंतर प्रलंबित कामाला 15 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली होती.
अक्कलकोट रोड परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईनचे काम सुरु होते. त्याठिकाणचे काम पूर्ण झाले होते. परंतु, त्याची अंतिम स्वच्छता करून ड्रेनेज ब्लॉक होतो का, याची पडताळणी कामगार करीत होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. कामासाठी खोदलेल्या दीड मीटर खोलीच्या चेंबरमध्ये एक कामगार उतरला.
उशिरपर्यंत तो बाहेर न आल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी खड्ड्यात उतरला. त्या दोघांना शोधण्यासाठी टप्प्याटप्याने आणखी चार कामगार उतरले, परंतु त्यातील दोघे जीवंत बाहेर आले. उर्वरित चौघांवर काळाने घाला घातला अशी माहिती पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली.