बाथरूममध्ये आंघोळ करताना 13 वर्षाच्या मुलाचा शाॅक लागून मृत्यू

सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे धक्कादायक दुर्देवी घटना घडली आहे. बाथरुममध्ये अंघोळ करत असताना शॉक बसून 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. पीयूष सुनील यादव (रा. औंध, ता. खटाव) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीयूष हा बाथरुममध्ये सकाळी अंघोळ करण्यासाठी गेला. यावेळी बाथरुममधून जुनी वायर लोंबकळत होती. वायरमधून विद्युत प्रवाह सुरू होता. बाथरूममध्ये आंघोळ करत असलेल्या पीयूषच्या पाठीला अचानक वायर लागली. त्यामुळे त्याला जोरदार शॉक लागला.

पियूषला शाॅक लागल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने औंध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार चंद्रकांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत.