ठाकरे गटाला मोठा धक्का!! किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा मोठा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर ठाकरे गटाला ही याचा मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुजीत पाटकर यांचा समावेश आहे. कोरोना काळात अनेक घोटाळा प्रकरणे समोर आली होती. यावेळी कोविड सेंटर प्रक्रियेत घोटाळा करण्यात आल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात येईल असे म्हणले जात होते. मात्र आता त्यांच्यावरच थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी मुंबई महापालिकेकडून कोविड काळात मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आला होता. कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेअंतर्गत करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांकडून लावण्यात आला होता.

यानंतर याप्रकरणी इडीकडून तपास सुरू करण्यात आला होता. २१ जून रोजी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीतच ६८ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच १५० कोटी रुपये किमतीची ईडीच्या हाती लागली होती. ईडीने केलेल्या छापेमारीत सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह इतर मुख्य व्यक्तींचा समावेश होता. गेल्या अनेक दिवसांपासून इडी या घोटाळ्याप्रकरणी तपास करीत आहे. आता हे प्रकरण ठाकरे गटाच्या अंगलटी आले असून किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.