रेकॉर्डवरील गुंडाला सापळा रचून पकडला; दोन पिस्टल, काडतुसांसह 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशी बनावटीची पिस्टल विक्री करणारा अट्टल गुन्हेगार परशुराम रमेश कुरवले यास स्थानिक गुन्हे शाखेने नामिशक्कल लढवत माण तालुक्यातील शेणवडी येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीच्या बोगस मित्राच्या नावे कॉल करून त्याला शेनवडी या ठिकाणी बोलवून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून दोन पिस्टल, काडतुसे व एक दुचाकी असा एक लाख ७० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परशुराम कुरवले सातारा, सांगली जिल्ह्यात पोलीस दप्तरी अट्टल गुन्हेगार म्हणून नोंद असलेला गुन्हेगार हा अनेक गुन्ह्या मध्ये सांगली सातारा पोलिसांना हवा होता. तो गावटी पिस्तूल विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती सातारा गुन्हेे अन्वेषण विभागाला मिळाली होती. आरोपी हुशार व चतुर असल्याने हाती लागत नव्हता. आटपाडी पोलीस ठाण्यात काही काळ काम केलेले व सध्या सातारा गुन्हे अन्वेषण विभागाचा पदभार असलेले अरुण देवकर यांनी कुरवले यास पकडण्यासाठी नामिशक्कल लढवली.

कोल्हापूरच्या कळबा जेल मध्ये दिड वर्षापूर्वी कुरवले होता तेथे गुन्हेगारीतुन मैत्री झालेल्या कुरवले यांच्या जोडीदाराच्या नावाने कुरवले यास फोन करून पिस्तूल विक्रीची पार्टी आहे, मी त्या पार्टीला घेऊन माण तालुक्यातील शेनवडी येथे येतो तु शेनवडीला ये तुझी वाट पहातो म्हणून पोलिसांनीच गुरुवारी मध्यरात्री मित्र म्हणून फोन केला आणि सापळा लावला.

गुरुवार दि. १६ रोजी शेनवडी फाटा परिसरात पिस्टल विक्रीसाठी फोन केलेल्या मित्राला आरोपी शोधत फिरत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर व पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी व सहकाऱ्यांनी शेनवडी फाटा परिसरात सापळा लावून सदर वर्णनाचा एक युवक त्याठिकाणी फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला. त्याची व गाडीची झडती घेतली असता.पोलिसांना दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

पोलिसांनी त्याला पिस्टलबाबत विचारणा केली असता विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून दोन पिस्टल, काडतुसे व एक दुचाकी असा एक लाख ७० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ,शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार,पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयूर देशमुख, स्वप्नील दौंड, धीरज महाडिक, मोहसीन मोमीण, शिवाजी गुरव यांनी करून म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या ताब्यात देवून परशुराम रमेश कुरवले याचेवर पिस्तूल विक्रीच गुन्हा दाखल करण्यात येवून आज शनिवारी दुपारी परशुराम रमेश कुरवले यांस म्हसवड न्यायालयात हजर केले आसता कुरवले यांस न्यायालयीन कस्टडी सातारा जेल मध्ये रवानगी करण्यात आली असल्याची माहिती सपोनि राजकुमार भुजबळ यांनी दिली