आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपने आपली कंबर कसली असून निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर 2024 ची निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सध्या भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या योजना आखत आहे. आज पार पडणाऱ्या बैठकीत भाजपची आगामी रणनीती आखली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजच्या बैठकीत अजित पवार गटाचे खासदार तसेच एकनाथ शिंदे गटातील आमदार देखील उपस्थित राहू शकतात. दुसरीकडे, देशात सत्ता टिकून राहण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. आता मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व 430 खासदारांना भेटणार आहेत.

यामध्ये, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा अशा इतर ठिकाणच्या खासदारांचाही समावेश असेल. या खासदारांसोबत होणाऱ्या बैठकांमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर भाजपचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असतील. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांचा गट देखील भाजपसोबत असल्यामुळे ही निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी असणार आहे.