औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थनगरातील सचिन सुगनचंद चितलांगी यांचे गुलमंडी भागात चितलांगी गिफ्ट व टॉईज, एल.आर. चितलांगी व वैष्णवी फन अशा तीन दुकाना आहेत. या तिन्ही दुकानांचे व्यवहार सचिन स्वत: सांभाळतात. त्यांच्या दुकानात 2014 पासून दत्तप्रसाद हा नोकर म्हणून कामाला होता. नातेवाईक असल्याने सचिन यांचा त्याच्यावर विश्वास होता. दुकानातील महत्त्वाच्या कामकाजाशिवाय हिशेब व आर्थिक व्यवहार देखील तो पाहायचा. सचिन यांच्यामार्फतच दत्तप्रसादची न्यु कुणाल गिफ्टस् अॅन्ड टॉईज याचा मालक पंकज खंडेलवाल व त्याचा नोकर रवि पानखेडे याच्याशी ओळख झाली. खंडेलवालकडून खरेदी केल्यानंतर एका चिठ्ठीवर माल व मालाची रक्कम लिहून दिली जात होती. त्यानंतर सचिन व खंडेलवाल हे दोघेही मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार वहित नमूद करायचे. तशी स्वाक्षरी देखील केली जात होती. २0१५ मध्ये सचिन यांच्या समर्थनगरातील घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. दत्तप्रसादवर विश्वास असल्याने दुकानाची जवळपास जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
Vo2 दत्तप्रसादला सचिन यांचा आपल्यावर विश्वास असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्याने खंडेलवाल यांच्याशी हातमिळवणी केली. पुढे या तिघांनी चिठ्ठीवर माल मिळाल्याची पोच घेत अनेकदा दत्तप्रसादच्या मदतीने खोटी बिले तयार केली. दुकानात माल येत नव्हता. मात्र, सचिन यांच्याकडून न मिळालेल्या मालाचे पैसे दत्तप्रसाद मार्फत खंडेलवाल आणि पानखेडे घेऊन जात होता. सचिन यांच्याकडून आलेले पैसे नंतर तिघेही आपसात वाटप करायचे.
दत्तप्रसाद बिलात नमूद केल्यानुसार माल आपल्याला मिळाला आहे. असे सांगायचा त्यामुळे सचिन डोळे झाकून खंडेलवाल मार्फत आलेल्या पानखेडेला द्यायचे. मात्र, माल खरेदी केलेला नसताना सचिन हे खंडेलवालला पैसे देत आहेत. हे त्यांना माहितीच नव्हते. दत्तप्रसाद गळ घालत असल्याने त्यांची फसवणूक झाली असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तर दत्तप्रसादने सचिन यांना फसवून मिळवलेली रक्कम त्याचा भावजी अशोक मुंदडा (रा. बालाजीनगर) याला दिल्याचा संशयही त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.