राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ऊसाने भरलेली ट्राॅली पलटी

कराड | पुणे- बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ वारुंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आज दि.26 रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा टायर फुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्राॅलीला जोराची धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, ऊसवाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन कराडच्या दिशेने निघाला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर वारुंजी फाट्यावरील उड्डाणपुलावर आला असता, कराडकडे निघालेल्या कंटेनर (एनएल-01- एई- 6820) चा अचानक टायर फुटला. यामुळे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलीतील ऊस मोठ्या प्रमाणावर महामार्गावर पसरला होता.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड, सलीम देसाई, अमित पवार यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी व कऱ्हाड शहरचे प्रशांत जाधव अपघातस्थळी दाखल झाले. ऊस वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला केला. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.