रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला शरद पवारांची अनुपस्थिती; आमंत्रण येऊनही घेतली ही भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या निमंत्रणानंतर शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. त्यांनी या संदर्भात रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये शरद पवार यांनी, “मी 22 जानेवारीनंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येईल” असे सांगितले आहे.

शरद पवार पत्रात काय म्हणाले?

शरद पवार यांनी चंपत राय यांना पत्र लिहीत म्हटले आहे की, “22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या भक्तीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील सोहळ्याबाबत रामभक्तांमध्ये उत्सुकता असून ते मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत. या ऐतिहासिक घटनेचा आनंद त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचेल.”

“22 जानेवारी रोजी उत्सव पूर्ण झाल्यानंतर श्री रामलल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. मी अयोध्येला येण्याचा विचार करत आहे, त्यावेळी मी भक्तीभावाने श्री राम लालाजींचे दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण झाले असेल. तुमच्या सौहार्दपूर्ण निमंत्रणाबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृपया माझ्या शुभेच्छा स्वीकारा”

दरम्यान, शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रातून हे स्पष्ट होते की रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. तसेच ते सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर राम मंदिराला भेट देतील. मात्र आता शरद पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात वाद होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.