Wednesday, June 7, 2023

पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : दुचाकी चालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने एकजण ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. यावेळी अज्ञात वाहनांचे चाक दुचाकी चालकांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाला. अपघातात तेजस गायकवाड (रा. मोरघर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा तालुका हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज गुरुवारी दि. 6 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दुचाकी क्रमांक (MH- 11- DE- 3742) गाडीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. दुचाकीला दिलेली धडक एवढी भीषण होती, की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेली आहे.

महार्गावर अपघातात जखमीला साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक हा घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने वाहनचालकाचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.