सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात मेढ्यासह परिसरात अनेक महिन्यापासून अवैध दारूविक्री केली जात आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची आज धरपकड केली. त्याच्या या कारवाईत एका दारूविक्रेत्यास त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेंढ्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध रीतीने दारू विक्री करण्याचा प्रकार केला जात आहे. दरम्यान, आठवडी बाजार दिवशी एका हाॅटेलमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून एकजण खुलेआम दारू विक्री करत असल्याची माहिती व्यसनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यास पकडले. त्यानंतर त्याला पकडून विलासबाबा जवळ यांच्या स्वाधिन केले.
विलासबाबा जवळ यांनी याबाबतची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांना दिली. त्यानंतर दारू विक्रेत्यास गाडीतून मेढा पोलिस स्टेशनला नेऊन मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहार. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.